बारामती : पाच वर्षापूर्वी आपल्याच वडिलांचा मुलाने खून करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुलाला बारामतीच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र नायायालयाने आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.
अभय दिगंबर काटे (रा. काटेवाडी, ता. बारामती अशी शिक्षा सुनावलेल्या आरोपी मुलाचे नाव आहे) तर दिगंबर दादासाहेब काटे असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मे २०१७ साली नीरा डाव्या कालव्याच्या शेजारी दिगंबर काटे यांचा धारधार शास्त्राने गळ्यावर वार करून खून केला होता. व पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्यांचा मृतदेह नीरा डाव्या कालव्यात फेकून देण्यात आला होता. याप्रकरणी वालचंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर घटनेत व केलेल्या तपासात अभय काटे याला अटक करून पोलिसांनी त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला होता.
या खटल्याची सुनावणी बारामतीच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात न्यायाधिश जे.पी. दरेकर यांच्यासमोर चालली. या खटल्यासाठी राज्य सरकारच्या विधी व न्याय विभागाने विशेष सरकारी वकील म्हणून अॅड. राजेश कातोरे यांची नियुक्ती केली होती. तर काटे कुटुंबियांच्या वतीने अॅड. सचिन झालटे, एस.पी. सहाने, निलीमा खर्डे- पाटील, ज्ञानेश्वर जे. माने यांनी काम पाहिले. तर कोर्ट पैरवी सहायक फौजदार नामदेव नलवडे व डी. एस. जगताप यांनी सरकारी पक्षास सहकार्य केले.
या खटल्यात सरकारी वकील अॅड. कातोरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी एकूण १३ साक्षीदार तपासले. परिस्थितीजन्य पुरावा व साक्षीदारांचे जबाब यावरून गुन्हा घडल्याचे निष्पन्न झाले. बचाव पक्षाने आरोपीला खोट्या गुन्ह्यात अडकवले जात असल्याचा युक्तिवाद केला. तर दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने सरकारी वकीलांचा युक्तीवाद ग्राह्य मानून आरोपी अभय काटे यास जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.
दरम्यान, यामध्ये खूनाच्या गुन्ह्यात आरोपी अभय याला जन्मठेप व १ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिना साधा कारावास अशी शिक्षा ठोठावली आहे. तर भादवि कलम २०१ मध्ये तीन वर्षे सश्रम कारावास, एक हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिना साधा कारावास अशी शिक्षा ठोठावली आहे.