पुणे : दोन जुळ्या आयटी इंजिनीअर बहिणींशी विवाह करणाऱ्या अकलूज (ता. माळशिरस) येथील नवरदेवाला चांगलेच महागात पडले आहे. नवरदेवावर अकलूज पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अतुल अवताडे असे गुन्हा दाखल झालेल्या नवरदेवाचे नाव आहे. याप्रकरणी माळेवाडी येथील राहुल फुले यांनी अकलूज पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई येथील आयटी इंजिनीअर असलेल्या दोन जुळ्या बहीणी रिंकी आणि पिंकी यांनी चक्क एकाच मुलासोबत इच्छेने लग्न केले आहे. अकलूज येथील अतुल अवताडे याच्यासोबत दोन हा अनोखा विवाह सोहळा दिवसांपूर्वी अकलूज-वेळापूर रोडवरील गलांडे हॉटेल येथे पार पडला आहे. या अनोख्या विवाहाला दोन्हीकडील जवळपास ३०० पाहुणे मंडळी उपस्थित होते.
पिंकी आणि रिंकी दोघी जुळ्या असल्याने दिसायलाही एकसारख्याच आहेत. त्यांच्या वडिलांचे काही दिवसांपूर्वी निधन झाल्यानंतर या मुली आईसोबत राहत होत्या. एकदा आई व दोन मुली आजारी पडल्यावर अतुल याच्या गाडीतून त्या दवाखान्यात जात होत्या. याचवेळी अतुल आणि या दोन तरुणींचा संपर्क वाढत गेला.
दरम्यान, पिंकी आणि रिंकी या लहानपणापासून एकत्रच राहिल्याने आपण लग्न करून एकाच घरी जायचे, हे दोघींनीही ठरवले होते. त्यामुळे आपण एकाच तरुणाशी लग्न करायचे, या दोघींनी फार आधीपासूनच ठरवले होते. अखेर त्याच्या कुटुंबाने या विवाहास मान्यता दिली होती. त्यानुसार अकलूज वेळापूर रोडवरील गलांडे हॉटेल येथे हा अनोखा विवाह संपन्न झाला.
याप्रकरणी माळेवाडी येथील राहुल फुले यांनी अतुल अवताडे याच्याविरोधात अकलूज पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार अवताडे याच्यावर भारतीय दंड संहिता १८६०च्या कलमानुसार पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा (NCR) दाखल करण्यात आला आहे. आणि तक्रार दाखल होताच पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे.