मुंबई : मुंबईच्या घाटकोपर दुर्घटनेतील मुख्य आरोपी भावेश भिंडेला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने उदयपूरमधून अटक केली आहे. लवकरच भिंडेला मुंबईत आणण्यात येणार असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.
मुंबईच्या घाटकोपर भागात सोमवारी १३ मे रोजी संध्याकाळच्या सुमारास एक मोठे होर्डिंग कोसळून त्यात सुमारे १७ जणांचा मृत्यू झाला. होर्डिंग एका पेट्रोल पंपावर कोसळल्याने त्याखाली दबून अनेक जण जखमी झाले. गेल्या दोन दिवसांपासून बचावकार्य सुरूच असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हे होर्डिंग ज्या इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने लावले होते, भावेश भिंडे हा त्या कंपनीचा संचालक असल्याने त्याच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्यानंतर आरोपी भिंडे त्याच्या कुटुंबासह फरार झाला होता. पोलिसांकडून भावेश भिंडेचा शोध सुरु होता. पोलिसांनी त्याच्या मुलूंड येथील घरी जाऊन त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याआधीच तो गायब झाला होता. ज्यावेळी पोलिसांनी त्याचे शेवटचे लोकेशन तपासले, त्यावेळी त्यांना त्याचे शेवटचे लोकेशन लोणावळ्यात आढळून आले. त्यानंतर पोलिसांचे एक पथक भिंडेचा शोध घेण्यासाठी लोणावळ्यात दाखल झाले. मात्र, त्याला पकडण्यात पोलिसांना यश आलं नाही.
दरम्यान, भावेश भिंडेचा पोलीस गेल्या दोन दिवसांपासून शोध घेत होते. अखेर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने आज सायंकाळी त्याला राजस्थानच्या उदयपूरमधून अटक केली आहे. लवकर त्याला पुढील कायदेशीर कारवाईसाठी मुंबईत आणण्यात येणार असल्याचे मुंबई पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. भावेश भिंडेने भाच्याच्या नावाने उदयपूरमध्ये हॉटेल रूम बुक केली होती, तिथे तो राहत होता.