भिगवण : इंदापूर तालुक्यातील शेटफळगढे गावात भुईमुगाच्या शेतीत अफूची लागवड करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या कारवाईत अफूची १६३ किलो वजनाची बोंडे जप्त करण्यात आली. भिगवण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने हा प्रकार उघडकीस आणला. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.
शेटफळगढे गावच्या हद्दीतील जमीन गट क्रमांक ६५ मध्ये ही अफूची शेती करण्यात आली होती. या प्रकरणी रामदास किसन वाबळे (रा. शेटफळगढे) या शेतकऱ्याला अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध भिगवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेतकऱ्याकडून ३ लाख २४ हजार ८०० रुपये किमतीची अफूची झाडे व बोंडे जप्त करण्यात आली.
भुईमुगाच्या शेतीत अफूची लागवड केल्याची माहिती भिगवण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश बावकर यांना खबऱ्यामार्फत मिळाली होती. त्यानुसार पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षकांकडून पूर्व परवानगी घेऊन तसेच महसूल विभागच्या सक्षम अधिकाऱ्यांना बोलावून योग्य त्या पोलीस पथकासह संबंधित ठिकाणी छापा घातला असता, जमीन गट क्रमांक ६५ मध्ये भुईमूगाच्या पिकात अफूची लागवड करून त्याचे संवर्धन व जोपासना केल्याचे निदर्शनास आले.
संबंधित ठिकाणी कायदेशीर कारवाई करून १६३ किलो ९०० ग्रॅम वजनाची अफूची झाडे तसेच ३ लाख २४ हजार ८०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून भिगवण पोलीस स्टेशन येथे रीतसर गुन्हा दाखल केला असून, रामदास किसन वाबळे याला अटक करण्यात आली आहे. अफूचे पीक दिसू नये म्हणून कडेने मका पिकाची लागवड केल्याचे आढळून आले.
सदरची कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देखमुख, अतिरिक्त पोलीस अधीक्षक संजय जाधव, बारामती विभागाचे पोलीस उपविभागीय अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली भिगवण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश बावकर, सहायक पोलीस निरीक्षक रूपेश कदम, पोलीस अंमदालर प्रदीप नलावडे, विजय लोडी, रणजित मुळीक, अंकुश माने, प्रसाद पवार, महिला पोलीस अंमलदार सारीका जाधव, कल्पना वाबळे यांनी केली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रूपेश कदम करीत आहेत.