मुंबई : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एक्सवर छगन भुजबळ हे भाजपच्या वाटेवर असल्याची पोस्ट लिहिल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आमच्या पक्षाचे निर्णय आम्ही घेतो. अंजली दमानिया घेत नाहीत. अलीकडच्या काळात अंजली दमानिया सुप्रिया सुळेंच्या जास्त संपर्कात आहेत. त्यामुळे त्या अशा प्रकारचे ट्विट करत असतील. पण, भुजबळ साहेब त्यांच्या पक्षात आहेत, आम्ही आमच्या पक्षात आहोत, अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली आहे.
काही वर्षांपूर्वी अंजली दमानिया यांनी छगन भुजबळांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. या पार्श्वभूमीवर त्यांनी एक्सवर छगन भुजबळांवरील आरोपांचा संदर्भ घेत भाजपाला लक्ष्य केले आहे. दमानिया यांच्या पोस्टनुसार, “भुजबळ भाजपाच्या वाटेवर?, एकेकाळी भुजबळांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध जनहित याचिका करणारा भाजपा त्यांना मोठा ओबीसी नेता बनवणार? अशा भ्रष्ट माणसांना मोठे करणार, राजकारणासाठी? कुठे फेडाल हे पाप” अशी पोस्ट त्यांनी लिहिली आहे. त्यामुळे छगन भुजबळ हे भाजपाच्या वाटेवर आहेत का, अशी जोरदार चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली आहे. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
दमानियांच्या पोस्टवर छगन भुजबळ यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मी ओबीसींसाठी काम करत आहे. मला कुठल्याही पदाची हौस नाही. शिवाय कोणत्या पक्षाचे प्रपोजल देखील मला आले नाही. मी मंत्री आहे, माझ्या विरुद्ध अजून तरी कोणी काही बोललेले नाही. अजित पवार देखील म्हणाले की, ते ओबीसींचे काम करत आहेत. त्यांना तो हक्क आहे. तुम्ही तुमच्या समाजाबद्दल बोलतात तसे ते देखील त्यांच्या समाजाबाबत बोलत आहेत, असे मत छगन भुजबळ यांनी व्यक्त केले.