मनमाड : देशातील पहिली सेमी हायस्पीड ट्रेन असलेल्या वंदे भारत एक्सप्रेसचे अपघात थांबता थांबेनात. आता पुन्हा एकदा वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला अपघात झाल्याची घटना घडली आहे. मनमाडच्या वडगावं जवळ ही अपघाताची घटना घडली आहे. या अपघातात तीन हरणांचा मृत्यू झाला आहे. पाण्याच्या शोधात असणाऱ्या हरणांना रेल्वे ट्रॅकवर आल्यावर वंदे भारतची धडक बसल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातानंतर वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी हरणाचे मृतदेह ताब्यात घेतले आहेत. या घटनेनंतर प्राणी प्रेमींमध्ये शोक व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मनमाडच्या वडगावजवळ ही अपघाताची घटना घडली असून या घटनेत हरणांचा छोटासा कळप हा पाण्याचा शोधात फिरत होता. पाणी शोधता शोधता या कळपातले काही हरणं ही ट्रॅकवर आले होते. या दरम्यान ट्रॅकवरून वेगाने धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसने तीन हरणांना भीषण धडक दिल्याची घटना घडली. या घटनेत हरणांचा अक्षरश चेंदामेंदा होऊन मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी हरणाचे मृतदेह ताब्यात घेतले आहेत. तसेच या अपघाताच्या घटनेने प्राणीप्रेमींमध्ये हळहळ व्यक्त होतं आहे.
याआधी देखील वंदे भारत एक्सप्रेसला अपघात झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. वंदे भारत एक्सप्रेसने वलसाडजवळ एका गायीला धडक दिल्याने अपघात झाला होता. तसेच गांधीनगर मुंबई दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसन ट्रेनला वटवाजवळ म्हशीचा कळप रूळावर आल्याने अपघाताची घटना घडली होती.