हैद्राबाद : सुपरस्टार अल्लू अर्जुनला तेलंगणा उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. अल्लू अर्जुनला सेशन कोर्टाकडून 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर त्याने उच्च न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला होता. न्यायालयाने आता त्याचा जामीन मंजूर केला आहे. हैद्राबादमधील संध्या थिएटरमध्ये पुष्पा 2 चित्रपटाच्या प्रीमिअर शोवेळी चेंगराचेंगरी होऊन एका महिलेचा मृत्यू झाला होता. त्या प्रकरणी अल्लू अर्जुनवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
नेमकं प्रकरण काय?
हैद्राबादच्या संध्या थिएटरमध्ये पुष्पा 2 चित्रपटाचा प्रीमिअर शो आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी अल्लू अर्जुनने पोलिस प्रशासनाना माहिती न देता उपस्थिती लावली होती. अल्लू अर्जुनला पाहण्यासाठी चाहत्यांची एकच गर्दी केली होती. अचानक झालेल्या गर्दीचे व्यवस्थापन त्या चित्रपट व्यवस्थापकांना करता आलं नाही. आणि त्याचा परिणाम त्या ठिकाणी चेंगराचेंगरीत झाला. त्यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला. 4 डिसेंबर रोजी घडलेल्या या घटनेनंतर त्या महिलेच्या कुटुंबीयांकडून अल्लू अर्जुन आणि संध्या थिएरट मालकाच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला होता.
अल्लू अर्जुनवर आरोप काय?
पुष्पा 2 च्या प्रीमियरसाठी अल्लू अर्जुनने उपस्थितीबद्दल कोणतीही आगाऊ माहिती न दिल्याचा आरोप करत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर संध्या थिएटरवर सुरक्षेबाबत निष्काळजीपणाचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेनंतर अल्लू अर्जुनने मृत महिला आणि तिच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त करत 25 लाख रुपयांची मदत केली आहे.