मुंबई: विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी आपल्याकडे अद्याप कोणाचाही अर्ज आलेला नाही. अर्ज आल्यानंतरच त्यादृष्टीने विचार केला जाईल, अशी भूमिका विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बुधवारी मांडली.
विरोधी पक्षनेतेपदासाठी विरोधकांच्या आघाडीतील एकाही पक्षाकडे आवश्यक १० टक्के (किमान २९) आमदारांचे संख्याबळ नसल्याचा मुद्दा उपस्थित केला जात आहे. विधानसभा अध्यक्षच विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय घेतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. आता हिवाळी अधिवेशन ‘चार दिवसांवर आल्याने अधिवेशनात विरोधी पक्षनेता असेल की नाही? याची चर्चा रंगली आहे. यासंदर्भात विधानसभा अध्यक्षांकडे विचारणा केली असता विरोधी पक्षांकडून विरोधी पक्षनेतेपदासाठी अर्जच आले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केल्याने विरोधी पक्ष काय पावले उचलणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
विरोधी पक्षनेतेपदाबाबतचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी घेणे तांत्रिकदृष्ट्या बरोबर असले तरी याचा निर्णय राजकीय पातळीवरच घेतला जाणार, हे स्पष्ट आहे. आघाडीत शिवसेनेकडे (ठाकरे) सर्वाधिक २० जागा आहेत. त्याखालोखाल काँग्रेस १६ आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे १० आमदार आहेत. या पक्षात अद्याप विरोधी पक्षनेतेपद कोणाकडे असावे, यावर चर्चा झालेली नाही. या विषयावर नागपूरला गेल्यावर चर्चा करून एकत्रित निर्णय घेऊ, असे महाविकास आघाडीच्या नेत्यांचे म्हणणे आहे. शिवसेनेकडे (ठाकरे) विरोधी पक्षनेतेपद गेल्यास ज्येष्ठ नेते भास्कर जाधव यांना पसंती मिळू शकते.
जाधव हे अनुभवी, अभ्यासू व आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. जाधव यांच्याशिवाय खुद्द आदित्य ठाकरे यांनाही हे पद घेण्याची मोठी संधी आहे, पण एवढ्या लहान वयात ते हे जबाबदारी स्वीकारतील का, याबाबत शंका आहे. शिवसेनेकडे (ठाकरे) हे पद जाणार असल्यास भाजप सकारात्मक विचार करेल, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. शिवसेनेला (ठाकरे) विरोधी पक्षनेतेपद दिल्यास महायुतीतील मित्रपक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यावर वचक ठेवता येईल, असे भाजपमधील धुरिणीना वाटते. आता कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष शिवसेनेला (ठाकरे) एकमुखी पाठिंबा देणार का, हे पाहावे लागेल.
…. तर दोन्ही पदे शिवसेनेकडे (ठाकरे)
विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपद सध्या शिवसेनेकडे (ठाकरे) आहे. अंबादास दानवे हे ऑगस्ट २०२२ पासून तेथे विरोधी पक्षनेतेपद भूषवत आहेत. विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद पुन्हा त्याच पक्षाकडे गेल्यास परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदावर काँग्रेस दावा करेल, असे मानले जाते. मात्र शिवसेनेने (ठाकरे) विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपद सोडण्याचा प्रश्नच नाही, असे दानवे यांनी बुधवारी स्पष्ट केले. शिवसेनेकडे (ठाकरे) विधान परिषदेत ८ सदस्य आहेत. काँग्रेसकडे ७, तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे ५ सदस्य आहेत. त्यामुळे संख्याबळानुसार शिवसेनाच (ठाकरे) परिषदेतही मोठा पक्ष ठरतो, असे सांगत परिषदेतील विरोधी पक्षनेतेपद सोडण्याची शक्यता दानवेंनी फेटाळून लावली. काँग्रेसमधून यासंदर्भात अधिकृत प्रतिक्रिया अद्याप आलेली नाही.