लोणी काळभोर : मागील दोन दिवसापूर्वी कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील हॉटेलवर छापा टाकून अवैध दारू विक्री केल्याचा लोणी काळभोर पोलिसांनी पर्दाफाश केला होता. या कारवाई पोलिसांनी 28 हजार रुपयांचा देशी विदेश दारूचा मद्यसाठा जप्त करून एकावर गुन्हा दाखल केला होता. ही घटना ताजी असतानाच, आता लोणी काळभोर पोलिसांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी खुलेआम सुरु असलेल्या जुगार व हातभट्टी दारू विक्रीच्या अड्ड्यावर शुक्रवारी (ता.12) छापा टाकला आहे. या छाप्यात पोलिसांनी सुमारे 11 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून एका महिलेसह 7 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
कैलास बापू यादव (वय -33), प्रविण बाबुराव मारकड (वय-34 राहिंजवस्ती, लोणी काळभोर, ता. हवेली, जि.पुणे. मुळ रा. रत्नापुर, ता.परांडा, जि.धाराशिव), हनुमंत मारुती अहिवळे (वय-36, रा. माळी मळा, लोणी काळभोर, ता. हवेली, जि.पुणे. मुळ रा. जुनोनी, ता. सांगोला, जि. सोलापुर), अनिल सुधाकर गायकवाड (वय-39, सध्या रा. माळी मळा, लोणी काळभोर, ता. हवेली, जि.पुणे. मुळ रा. हर्गरगानळ, ता. तुळजापुर जि. धाराशिव), पांडुरंग भास्कर शेंडगे (वय-51, राहिंजवस्ती, लोणी काळभोर, ता. हवेली, जि.पुणे. मुळ रा. रत्नापुर, ता. परांडा, जि.धाराशिव), राजेंद्र मोहन कलापुरे (वय-51 , सध्या रा. जिल्हा परिषद शाळेच्या पाठीमागे, कदमवाकवस्ती, ता. हवेली, जि.पुणे) व सुनिता विशाल कसबे (वय-34 , रा. काळुबाई माता मंदिराच्या पाठीमागे, लोणी काळभोर ता. हवेली जि. पुणे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस अंमलदार बाजीराव चंदर वीर व चक्रधर जयद्रथ शिरगीरे यांनी सरकारच्या वतीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या घटनेत, चक्रधर शिरगीरे हे एक पोलीस अंमलदार असून ते लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण विभागात कार्यरत आहेत. चक्रधर शिरगीरे हे शुक्रवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गस्त घालत होते. तेव्हा लोणी काळभोर गावातील काळुबाई मंदिराच्या पाठीमागे एक महिला बेकायदा हातभट्टी दारू विकत आहे. अशी माहिती पोलिसांना एका खबऱ्यामार्फत मिळाली होती.
मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकला असता, आरोपी सुनिता कसबे या स्वत: च्या आर्थिक फायदया करीता प्लॅस्टीकच्या कॅनमधून बेकायदा दारू विक्री करताना आढळून आल्या. पोलिसांनी 8050 रुपये किंमतीची सुमारे 70 लिटर हातभट्टी दारू जप्त करून कसबे यांच्या विरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र प्रोव्हिविशन अॅक्ट कलम 65. (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार केतन धेंडे करीत आहेत.
दुसऱ्या घटनेत, पोलीस अंमलदार बाजीराव वीर हे लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास गस्त घालत होते. गस्त घालत असताना, पोलिसांना राहिंजवस्तीजवळील आदिज चिकण सेंटर या दुकानाच्या समोर काही इसम पैशांवर जुगार खेळत आहेत. अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकला. तेव्हा वरील 6 आरोपी बेकायदेशीरपणे 52 पानी पत्त्यांचा रमी हा जुगार पैशांवर खेळत असताना आढळून आहे. पोलिसांनी या छाप्यात 3 हजार 50 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून 6 जणांवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम कलम 12 अ. प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार गणेश सातपुते करीत आहेत.
अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले
मागील तीन दिवसांपासून लोणी काळभोर पोलिसांनी अवैध धंदेवाल्यांवर कारवाईचा बगडा उगारला आहे. कदमवाकवस्ती येथील हॉटेलमधून अवैध देशी विदेशी दारू विक्री, लोणी काळभोर गावातून हातभट्टी दारू विक्री व राहिंज वस्ती परिसरातील जुगार अड्ड्यावर छापे टाकून कारवाई केली आहे. या छाप्यांमध्ये 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून 8 जणांवर गुन्हे दाखल केले आहे. लोणी काळभोर पोलिसांच्या कारवाईमुळे अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत. तर पोलिसांच्या या कारवाईचे नागरिकांकडून भरभरून कौतुक होत आहे.