मंचर : आंबेगाव तालुक्यातील मंचर येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. गुन्हा मागे घेण्यासाठी एका बारा वर्षीय मुलाचे शाळेच्या मैदानातून अपहरण केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना निरगुडसर गावच्या हद्दीतील पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय येथे बुधवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
आर्यन विक्रम चव्हाण (वय १२) असं अपहरण करण्यात आलेल्या मुलाचे नाव आहे. याबाबत अपहरण झालेल्या आर्यनचे वडील विक्रम गोरक्षनाथ चव्हाण (रा. निरगुडसर) यांनी पारगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यावरून पोलिसांनी राजू जंबुकर (वय २६, रा. घुलेवाडी, ता. संगमनेर) याच्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विक्रम चव्हाण यांची पत्नी अर्चना हिने एका प्रकरणाबाबत आरोपी राजू जंबुकर याच्यावर संगमनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा मागे घ्यावा यासाठी आरोपी राजू जंबुकर यांनी माझा मुलगा आर्यन चव्हाण याला तो शिक्षण घेत असलेल्या निरगुडसर गावच्या हद्दीतुन पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय येथून बुधवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास कशाचे तरी आमिष दाखवून पळवून नेले आहे. पुढील तपास पारगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब लोकरे करीत आहेत.
याबाबत पारगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे म्हणाले कि, आरोपी राजू जंबुकर याच्यावर संगमनेर पोलीस ठाण्यात यापूर्वी विविध गुन्हे दाखल आहे. त्याला पकडण्यासाठी पारगाव पोलीस ठाणे आणि एलसीबीची पथके मागावर आहेत. लवकरच आरोपीला अटक करण्यात येईल.