पुणे : कात्रज चौकातील उड्डाणपुलाच्या कामामुळे पीएमपीच्या स्थानकांच्या जागेत बदल करण्यात आले आहेत. बदललेल्या स्थानकांची माहिती प्रवाशांना मिळण्यासाठी पीएमपीने सहा ठिकाणी फलक बसवले आहेत. यामुळे पीएमपीच्या प्रवाशांना कात्रज चौकातून कुठे प्रवेश करावा, याची माहिती मिळणे सोपे होणार आहे.
याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, वाहतूक पोलिस आणि पीएमपीएमएलची नुकतीच संयुक्त बैठक झाली. याबैठकीत कात्रज चौकातील बस थांबे स्थलांतरीत करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यानुसार आम्ही येथील स्थानक, थांब्याच्या जागा बदलत आहे. प्रवाशांना याची माहिती मिळावी, याकरिता बदललेल्या ठिकाणी आम्ही सहा फलक बसवले आहेत, अशी माहिती पीएमपीचे मुख्य वाहतूक व्यवस्थापक सतीश गव्हाणे यांनी दिली.
कात्रज चौकातील उड्डाणपुलाचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे ३ डिसेंबरपासून येथील वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यासोबतच येथील पीएमपीचे स्थानकाचे कामकाज, थांब्यांच्या जागा देखील हटवण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांची मोठी गडबड होणार आहे. त्यामुळे प्रवाशांना बस थांब्यांच्या योग्य ठिकाणाची माहिती मिळावी, याकरिता पीएमपीने सहा ठिकाणी फलक लावलेले आहेत.