डोणगाव (बुलढाणा): अंजनी बुद्रुक शेतशिवारात वाघ दिसल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले. त्यातच अंजनी शेतशिवारात रोह्याच्या पिलाची शिकार झाल्याने वाघ अथवा बिबट असल्याची भीती वाढली आहे. रब्बी पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग वाढली आहे. दिवसा व रात्रीही शेतकरी शेतात राहात आहेत. मात्र, मागील काही दिवसांपासून अंजनी बुद्रुक, हिवरा साबळे, उकळी सुकळी अशा कित्येक ठिकाणी वाघ असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. आपल्या परिसरात वाघ आल्याचे सांगण्यात येत आहे. तो वाघ की विबट, अशी चर्चा ही अफवाही असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, वनविभागाने गस्त वाढविली. २९ नोव्हेंबरच्या सकाळी एका रोह्याच्या पिलाची शिकार झाली. यामुळे लोकांची पाचावर धारण बसली आहे. अंजनी बुद्रुक शेतशिवारात वाघ दिसल्याचे काही लोकांनी पाहिले. २३ नोव्हेंबरच्या रात्री दहा वाजता मेहकर ते डोणगाव रोडवर अंजनी बुद्रुकजवळ राज्य महामार्गावरून शेतात वाघ किंवा बिबट्यासारखा प्राणी जाताना काही लोकांनी पाहिल्याचे सांगण्यात येत आहे. अंजनी येथील डॉक्टर वसंता नागोलकर, डोणगाव येथील गणेश उर्फ बबलू वाघमारे यांच्यासह रस्त्याने जाणाऱ्या कित्येक लोकांनी आपली वाहने थांबवून हा प्राणी पाहिला.
दुसऱ्या दिवशी एक व्हिडीओ व्हायरल झाला. ज्यात रस्त्यावरून शेतात जात असलेला वाघासारखा प्राणी दिसला, तोच व्हिडीओ कित्येक जण विविध ठिकाणचा असल्याचे सांगून व्हायरल करीत असल्याने तो वाघ किंवा बिबट नेमका कोणत्या परिसरात आहे, अंजनी परिसरात असेल तर त्याने शिकार केलेला प्राणी दिसून आला असता असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत.
२९ नोव्हेंबरच्या सकाळी माजी सभापती बाबुराव नागोलकर हे शेतात गेले असता त्यांना त्यांच्या शेजारील रत्नापूर पांदण रस्त्यालगत एका रोह्याच्या पिलाची शिकार झालेली दिसून आली. ही अफवा नसून वाघ अथवा बिबट्यासारख्या प्राण्याचे वास्तव्य असल्याचे निष्पन्न होताच सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.