लोणी काळभोर : कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील विवाहितेला सासरच्या मंडळींकडून शाररीक व मानसिक त्रास देऊन छळ केल्याची घटना घडली आहे. एवढ्यावरच न थांबता सासरच्या मंडळींनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना धालेवाडी (ता. पुरंदर) येथे नोव्हेंबर २०२० ते १२ एप्रिल २०२४ या कालावधीत घडली आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात पतीसह सासू सासऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी 24 वर्षीय विवाहितेने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती नरेंद्र सुरेश कदम (वय 32), सासू कमल सुरेश कदम (वय 45) व सासरे सुरेश सावळाराम कदम (वय ६०, सर्व रा. धालेवाडी, जेजुरी ता. पुरंदर जि. पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत विवाहितेचा धालेवाडी येथील नरेंद्र कदम यांच्याही विवाह झाला होता. विवाहानंतर काही दिवस चांगले गेले. त्यानंतर विवाहितेला पती नरेंद्र कदम, सासरे सुरेश कदम व सासु कमल कदम यांनी संगणमत करुन वारंवार शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच विवाहितेला जीवे मारण्याची धमकी देवुन मानसिक त्रास दिला आहे.
सासरच्या मंडळींकडून वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून विवाहितेने लोणी काळभोर पोलीस ठाणे गाठले. त्यानंतर पती, सासू सासऱ्याच्या विरुद्ध तक्रार दिली. त्यानुसार आरोपींच्या विरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 85, 115 (2), 352, 351 (2), 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पूजा माळी करीत आहेत.