पुणे : येरवडा येथे नव्याने बांधकाम सूरु करण्यात येणाऱ्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारत क्र. २ या ठिकाणी एका घरात दोन सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. येरवडा मध्यवर्ती प्रशासकीय इमारत क्रमांक दोनच्या इमारतीचे काम सुरू आहे. विधानसभेच्या निवडणुकीआधी या इमारतीचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडले होते. या ठिकाणी आतील बाजूस गेले पन्नास वर्षापासून शासकीय वसाहत आहे. शुक्रवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, या चाळीत आता एका घरात मुमताज इम्राहिम शेख (वय ५७) ह्या एकट्याच राहतात. त्याच ठिकाणी बाहेरील बाजूस त्यांची चहाची टपरी असून त्या आपला उदरनिर्वाह करीत असतात. त्या आज दुपारी बारा वाजता घर बंद करून येरवडा येथे बाजारासाठी गेल्या असताना दुपारी १ वा. च्या सुमारास अचानक घरातून धूर येत असल्याचे याठिकाणी काम सुरू असल्याने येथे असणाऱ्या सुरक्षारक्षकांच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ अग्निशमन दलाला याची माहिती दिली.
त्याच वेळी आणखीन एका सिलेंडरचा स्फोट झाला. येरवडा अग्निशमनची गाडी तात्काळ घटनास्थळी पोहचून त्यांनी आग विजविण्यात यश मिळवलं. घरात, तसेच परिसरात कोणी नसल्याने मोठी दुर्घटना झाली नाही. यात शेख यांचे संसारोपयोगी साहित्य मात्र संपूर्ण जळून खाक झाले आहे.