लोणी काळभोर: नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिरुर-हवेली मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांनी रेकॉर्ड ब्रेक अशा मताधिक्याने विजय मिळवला. परंतु, त्यांची आगामी काळातील वाटचाल सोपी नसून एकामागून एक आव्हानांचा सामना त्यांना करावा लागणार आहे. या आव्हानांना यशस्वीपणे तोंड देऊन मतदारांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात ते कितपत यशस्वी ठरणार, याचे उत्तर येणारा काळच देणार आहे.
ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली कटके यांनी मताधिक्याचे यापूर्वीचे सर्व आकडे मोडीत काढून तब्बल ७४ हजार ५५० एवढ्या मतांनी विजय संपादन केला. हवेली तालुक्यात त्यांना ४७ हजार ५०७ इतके भरीव मताधिक्य मिळाले. शिरूर तालुक्यातून कटके हे २७,०४३ मतांनी आघाडीवर आहेत. माऊली कटके यांच्या स्वतःच्या हवेली तालुक्यातील ३९ गावांपैकी फक्त टिळेकरवाडी व न्हावी सांडस या दोन गावांत अशोक पवार यांना आघाडी मिळाली आहे. अशोक पवार यांना टिळेकरवाडी गावात २७१, तर न्हावी सांडस गावात २०५ मतांची आघाडी मिळाली. उर्वरित गावांत माऊली कटके यांना आघाडी मिळाली आहे. सर्वात जास्त आघाडी वाघोली (२०५९९), लोणी काळभोर (३०५९) व केसनंद (२७९६) या तीन गावांमध्ये मिळाली आहे.
गेल्या अनेक वर्षांत हवेली तालुक्यात सक्षम, सर्वसमावेशक, जनतेशी नाळ जोडलेले, जनतेला भेडसावणाऱ्या प्रश्नांची जाणीव असलेले व विकासाची दूरदृष्टी असणारे नेतृत्व तत्कालीन प्रस्थापित राजकीय मंडळीनी तयार होऊ दिले नाही. तसेच तालुक्यातील बऱ्याच नेत्यांनी सुरुवातीपासून शेवटपर्यंत एखाद्या वरिष्ठाचे नेतृत्व कधीच मान्य केले नाही. या बंडखोर स्वभावामुळे हवेली तालुक्याचा ग्रामीण भाग सर्वच क्षेत्रात विकासाच्या बाबतीत मागे राहिला. तालुक्याच्या ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास होऊ शकला नाही. त्याचे दुष्परिणाम आजच्या तरुण पिढीला भोगावे लागत आहेत.
बदललेला काळ, प्रभावी सत्तास्थान दर्शविणाऱ्या काट्याने बदललेली दिशा, राज्यातील प्रभावी असणाऱ्या राजकीय घराण्यांनी आपल्याला नवीन प्रतीस्पर्धी नको म्हणून हवेली तालुक्यासह सर्वच तालुक्यातील नवीन नेतृत्वाचे पाय ओढण्याचे काम केले आहे. तालुक्यात एखादा नेता मोठा होत असेल, तर तत्काळ त्याच्या विरोधकाला श्रेष्ठींकडून ताकद दिली जाते. प्रत्येक ठिकाणी दोघांमध्ये भांडण लावून राज्य व देशपातळीवरील सत्ता आपण आरामात भोगायची हे वरिष्ठांचे धोरण असल्याने हवेली तालुक्यात नवीन नेतृत्वच तयार होऊ शकले नाही. त्याचप्रमाणे हवेली तालुक्यातील नागरिकांनी ही एकमेकांना खाली खेचण्यात समाधान मानले. तालुक्यातील एखाद्या नेत्याला चांगली पदे मिळायला सुरुवात होताच त्याचे विरोधक सक्रिय होऊन लगेच त्याचा ” करेक्ट कार्यक्रम ” करत असत. त्यामुळे संपूर्ण तालुक्यात ज्याच्या शब्दाला मान असेल, ज्याच्या मागे जनता असेल असे सर्वसमावेशक नेतृत्व तयारच झाले नाही. प्रत्येक नेता आपले गाव, संस्था आणि संबंधित संस्थेच्या कार्यक्षेत्रापुरताच मर्यादित राहिला. नेत्यांनी या सीमारेषा आपल्या भोवती आखून घेतल्यामुळे तालुक्याची चौफेर विकासाच्या संदर्भात अपरिमित हानी झाली.
हवेली तालुक्याची भौगोलिक रचना ही नविन नेतृत्व तयार न होण्यामागील एक महत्वाचे कारण आहे. पुणे व पिंपरी चिंचवड या दोन मोठ्या शहरांमुळे तालुक्याचे आपोआपच पूर्व व पश्चिम असे भाग पडले आहेत. या दोन्ही भागात संपर्काचा अभाव आहे. पूर्व व पश्चिम या दोन्ही भागात रोटी-बेटी व्यवहार अत्यंत कमी प्रमाणात होतात. या विशाल भूभागावर नियंत्रण असणारे नेतृत्व तयारच झाले नाही, असे म्हणण्यापेक्षा असे नेतृत्व काही लोकांनी तयारच होऊ दिले नाही.
विधानसभा मतदारसंघाच्या कार्यक्षेत्रांची पुर्नरचना करताना नेहमी हवेली तालुक्यावर अन्यायच झाला आहे. पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिकांची हद्द वगळता हवेली तालुक्याचा ग्रामीण भाग चार विधानसभा मतदारसंघात समाविष्ट करण्यात आला आहे. त्यामुळे तालुक्यातील नागरीक एक होत नाहीत, तसेच एकाच तालुक्यात चार आमदार असल्याने आमदार ही या तालुक्याच्या विकासाचा गांभीर्याने विचार करत नाहीत. शिरुर- हवेली, पुरंदर-हवेली, हडपसर व खडकवासला या चार विधानसभा मतदारसंघात हवेली तालुक्याचा ग्रामीण भाग विभागला आहे. त्यामुळे इतर तालुक्यांशी तुलना करता विकास कामे वेगाने होत नाहीत. तालुक्यात आज जो काही विकास दिसत आहे, तो फक्त जमिनींचा बाजारभाव वाढल्याने लोकांकडे आलेल्या पैशातून झालेला आहे. राज्य सरकार, केंद्र सरकार, जिल्हा परिषद आदी शासकीय माध्यमातून ज्या पायाभूत सुविधा तयार होणे आवश्यक होते, त्या अजिबात झालेल्या नाहीत. हवेली तालुक्याच्या पंचायत समितीला स्वतः च्या मालकीची सुसज्ज इमारत नाही, तालुक्याला ग्रामीण रुग्णालय नाही. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आदी क्षेत्रात तालुका प्रचंड मागासलेला आहे. हवेली तालुक्यातील लोकांचा स्वभाव मुळातच बंडखोर असून चांगल्या माणसाला चांगले व वाईट माणसाला वाईट तोंडावर म्हणायची ताकद हवेली तालुक्यातील माणूस ठेवतो.
थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखाना बंद असून गुलटेकडी येथील हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीची बरेच वर्ष निवडणुकच झाली नव्हती. त्यामुळे नवीन नेतृत्व कसे काय तयार होणार ? आपापल्या गावातील ग्रामपंचायतींच्या निवडणूका लढवून सरपंच, उपसरपंच व सदस्य या पातळीच्या वर नवीन, युवा नेतृत्व जाऊ शकत नाही. कधीतरी हवेली पंचायत समिती किंवा पुणे जिल्हा परिषदेची निवडणूक लढवण्याची संधी युवकांना मिळते. मात्र, सक्षम वरिष्ठ नेतृत्व नसल्याने पूर्व हवेलीचा परिसर विकासाच्या बाबतीत प्रचंड प्रमाणात मागे आहे. फक्त पुणे व पिंपरी चिंचवड या महानगरपालिकांच्या लगत असल्याने नेता नसतानाही नागरिकांनी स्वतःच स्वतःचा विकास करण्याचे मनावर घेतले आहे. परंतु, शहरालगत असल्याने आर्थिक विकास होत असला तरी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक पातळीवर विकासाच्या दृष्टीने प्रगती शून्य आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर माऊली कटके यांच्यासमोर प्रश्नांचा डोंगर उभा आहे. शिरूर तालुक्यातील घोडगंगा व हवेली तालुक्यातील यशवंत सहकारी साखर कारखाना हे दोन्ही सहकारी कारखाने केंद्र व राज्य सरकारची मदत घेऊन सुरु करणे. मतदारसंघात नियोजित असलेले दोन्ही रिंगरोड सुरु करणे. पुणे महानगरपालिकेच्या हद्दीपासून जवळ असलेल्या गावांना महापालिकेने शुद्ध पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी महापालिकेवर दबाव आणणे. लोणी काळभोरपर्यंत मंजूर असलेली मेट्रो उरुळी कांचन पर्यंत नेऊन लवकरात लवकर सुरु करणे. वाघोलीपर्यंत मंजूर असलेली मेट्रो शिरुर शहरापर्यंत नेणे. थेऊर, रामदरासारख्या तीर्थक्षेत्रांपर्यंत जाणारे रस्ते चांगल्या दर्जाचे करून त्या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना सोईसुविधा पुरवणे. वढू येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाचा विकास करणे. तसेच ही सर्व कामे करत असताना सर्वसामान्य जनतेच्या वाढलेल्या अपेक्षा पूर्ण करणे. एकंदरीत माऊली कटके यांच्या पुढे अनेक आव्हाने आहेत. ही आव्हाने ते कसे पेलतात, हे आगामी काळात समजणार आहेत.