मेलबर्न : १६ वर्षाखालील मुलांवर सोशल मीडियावर बंदी घालणाऱ्या कायद्यास ऑस्ट्रेलियन सरकारने मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे मुलांना सोशल मीडियावर बंदी घालणारा जगातील पहिला देश ऑस्ट्रेलिया बनला आहे. नव्या कायद्यानुसार, सोशल मीडियाशी संबंधित कंपन्यांना कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी लागणार आहे. १६ वर्षांखालील मुलांचे अकाऊंट आढळून आल्यास कंपन्यांना ३३ दशलक्ष डॉलरएवढा दंड ठोठावण्यात येणार आहे.
विरोधी पक्षांच्या दुरुस्त्यांवर सरकारच्या वतीने कायद्यात सुधारणा करण्याची तयारी दर्शविण्यात आली. बालहक्क संघटनांसह काही वकिलांनी या कायद्यास विरोध दर्शविला होता. मात्र, ७७ टक्के लोकसंख्येने नव्या कायद्यास पाठिंबा दर्शविला होता. गेल्या महिन्यात ऑस्ट्रेलियन सरकारच्या वतीने लहान मुलांना सोशल मीडियावर मज्जाव करणारा कायदा करणार असल्याचे जाहीर केले होते. या वयोगटातील मुलांनी मैदानी खेळास प्राधान्य देण्याची गरज असल्याचेही सरकारच्या वतीने नमूद करण्यात आले.
१३ मतांनी नव्या कायद्यावर शिक्कामोर्तब
ऑस्ट्रेलियन सिनेटमध्ये ३४ विरुद्ध १९, तर लोकप्रतिनिधीगृहात १०२ विरुद्ध १३ मतांनी नव्या कायद्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. विरोधी पक्षांनी नव्या कायद्यात दुरुस्त्या सुचवल्या आहेत.