कुर्डूवाडी (सोलापूर): सोशल मीडियाच्या माध्यमातून आलेल्या लिंकद्वारे ऑनलाईन ट्रेडिंग करून सुरुवातीला मिळालेल्या आमिषाला बळी पडून भुताष्टे (ता. माढा) येथील जि.प. शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक श्रीनिवास मोहिते यांनी सुमारे २४ लाख रुपये गमावले. याबाबत श्रीनिवास भुजंगराव मोहिते (रा.भोसरे, ता. माढा) यांनी कुर्डूवाडी पोलिसात फिर्याद दाखल केली आहे.
फिर्यादी मोहिते हे भुताष्टे येथील जि.प. प्राथमिक शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक असून, ते २ जुलै रोजी रात्री ८ वाजता घरी असताना त्यांना एम ४ एचडीएफसी सिक्युरिटीज ग्रुप या ग्रुपमध्ये व्हेरोनिका गुप्ता या ग्रुप अॅडमिनने त्यांना ग्रुपमध्ये अॅड केले. सदर ग्रुप फिर्यादी हाताळत असताना ४ जुलै रोजी सदर ग्रुपवर फिर्यादीला एचडीएफसी सिक्युरिटीचे ट्रेडिंग अकाऊंट ओपन करण्याबाबत लिंक आली. सदर लिंकद्वारे अकाऊंट ओपन करुन सदर अकाऊंट ओपन केल्याबाबत व्हेरोनिका गुप्ता यांनी सदर बँकेचे प्रतिभूती आंतरिक खाता आवेदन पत्र पाठवले.
सदर ग्रुपवर फिर्यादीला काही सभासदांची गुंतवणूक ही लाखाची व कोटींची असल्याचे दिसत होते. त्यानंतर फिर्यादीने सदर अकाऊंटवर दि. ५ जुलै ते १० सप्टेंबरच्या दरम्यान २३ लाख ८२ हजार १०० रुपये इतकी रक्कम जमा केली. फिर्यादीने सदर अॅप उघडून त्याला दिलेला युजर आयडी व पासवर्ड टाकून पाहिले असता त्यामध्ये ४० लाख १३ हजार ४७५ रुपये प्रॉफिट झाल्याचे दिसले. त्यामुळे त्या रकमेचा विड्रॉल करण्यासाठी गेले असता सदर रक्कम विड्रॉल झाली नाही. सदर ब्रँचने सदर ट्रेडिंग अकाऊंट फसवे असून, बँकेशी निगडित नसल्याचा मेसेज पाठवला. त्यामुळे २३ लाख ८२ हजार १०० रुपये इतक्या रकमेची फसवणूक केल्याबाबत फिर्यादी मोहिते यांच्या लक्षात आल्याने संबंधित संशयित आरोपी व्हेरोनिका गुप्ता व सुरज रेली या दोघाविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे.