पुणे : नात्यातील मुलीबाबत अपशब्द वापरल्याने अल्पवयीन मुलांनी शाळकरी मुलाच्या डोक्यात दगड मारल्याची घटना घडली आहे. ही घटना बुधवारी सकाळी आठच्या सुमारास शहरातील कोंढवा भागात घडली आहे. याप्रकरणी तीन अल्पवयीन मुलांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मुलाच्या वडिलांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ वर्षीय मुलगा कोंढव्यातील टिळेकरनगर भागात राहण्यास आहे. मुलाने शाळेतील एका मुलीबाबत अपशब्द उच्चारल्याने अल्पवयीन मुले चिडली होती. बुधवारी सकाळी आठच्या सुमारास तो शाळेत निघाल होता. टिळेकरनगर भागातील आकृती सोसायटीजवळ तीन अल्पवयीनांनी मुलाला अडवले. त्याला शिवीगाळ करुन बेदम मारहाण केली.
तसेच एका मुलाने शाळकरी मुलाच्या डोक्यात दगड मारल्याने त्याला गंभीर दुखापत झाली. मारहाण करुन अल्पवयीन मुलं पसार झाल्याचे फिर्यादी म्हटले आहे. दरम्यान, गंभीर जखमी झालेल्या मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्या डाेक्याला गंभीर दुखापत झाली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पूजा पाटील करत आहेत.