पुणे : बंद फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी २० हजारांचे दागिने आणि इतर ऐवज असा मिळून १ लाख १६ हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना १९ ते २३ नोव्हेंबर कालावधीत मांगडेवाडीतील विघ्नहर्ता कॉम्प्लेक्समध्ये घडली आहे. याप्रकरणी राहूल विजय केकाणे (वय ३१ रा. मांगडेवाडी, कात्रज) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार केकाणे हे मांगडेवाडीतील विघ्नहर्ता कॉम्प्लेक्स राहायला आहेत. १९ ते २३ नोव्हेंबर कालावधीत ते गावी गेले असता, चोरट्यांनी त्यांच्या बंद फ्लॅटचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील रोकड आणि सोन्याचांदीचे दागिने असा सव्वा लाखांचा ऐवज चोरून नेला आहे. गावाहून आल्यांनतर केकाणे यांना चोरी झाल्याचे दिसून आले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक नीलेश मोकाशी तपास करीत आहेत.