कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. महिन्यापूर्वी स्वेच्छानिवृत्ती घेतलेले व सध्या काही कामानिमित्त कोळोशी-वरचीवाडी येथे गावी आलेले निवृत्त सहा. पोलिस उपनिरीक्षकाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. विनोद मधुकर आचरेकर (वय-५५. मूळ रा. कोळोशी-वरचीवाडी, सध्या रा. भांडूप) असं हत्या करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. ही घटना कोळोशी-वरचीवाडी येथील त्यांच्या राहत्या घरातच बुधवारी रात्री साडे अकराच्या सुमारास घडली आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
धक्कादायक बाब म्हणजे आचरेकर यांचा मृतदेह नग्नावस्थेत आढळल्याने तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत. त्यांच्या घरी रात्री सोबत जेवण करून झोपण्यासाठी आलेला त्यांचा नातलग सिद्धीविनायक उर्फ पप्पू संजय पेडणेकर (वय-२४, कोळोशी-वरचीवाडी) यानेच या घटनेची माहिती आपल्या वडीलांसह १०० नंबरवर कॉल करून पोलिसांना दिली.
दरम्यान, सुरूवातीला तो विसंगत माहिती देत होता. मात्र, त्याच्याकडे केलेल्या खोल चौकशी दरम्यान त्याने विनोद आचरेकर यांचा खून डोक्यात कुदळ मारून आपणच केल्याची कबुली पोलिसांकडे दिली आहे. खूनाचे कारण मात्र अद्यापही स्पष्ट झाले नाही. या घटनेचा तपास पोलीस करत आहेत.