खडकवासला : खडकवासला परिसरातील कोल्हेवाडी येथे स्टेटस ठेवल्याच्या रागातून खून केल्याची घटना घडली होती. ही घटना बुधवारी (दि. २७) घडली आहे. सतीश सुदाम थोपटे (वय ३८, रा. कोल्हेवाडी, खडकवासला, मूळ रा. खानापूर, थोपटेवाडी) असं कोयत्याने वार करून खून केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी चार जणांना हवेली पोलिसांनी गुरुवारी अटक केली आहे. मात्र, एक आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
सोहेल ऊर्फ फुक्या साजिदअलि जोरा (वय-१९), अक्षय उर्फ बाबू बालाजी शेलार (वय २४, दोघे रा. शिवरे, ता. भोर), जीवन ऊर्फ बाळ्या शैलेश जगताप (वय २७, रा. दत्तवाडी, पुणे) आणि देविदास उर्फ देवा लक्ष्मण तांबट (वय २०, रा. कांजळे, ता. भोर), अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर भाऊसाहेब किवळे (पूर्ण नाव समजले नाही) हा अद्याप फरार आहे. याप्रकरणी सतीश थोपटे याच्या पत्नीने हवेली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पुणे जिल्हा ग्रामीण पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या देखरेखीखाली गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या पथकासह, तसेच हवेली पोलिसांनी तातडीने हल्लेखोरांचा शोध सुरू केला आणि गुन्हा घडल्यानंतर अवघ्या आठ ते दहा तासांत चौघांना जेरबंद केले. मयत सतीश थोपटे याच्याविरोधात हवेली पोलिस ठाण्यात खानापूर येथे दुकानदारावर गोळीबार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. तर हल्लेखोर देविदास तांबट याच्यावर गंभीर गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिस निरीक्षक सचिन वांगडे यांच्या देखरेखीखाली हवेली पोलिस तपास करीत आहेत.
नेमकं प्रकरण काय?
सतीश थोपटे याच्या घरावर नांदोशीचे माजी सरपंच भाऊसाहेब किवळे याने २५ लाख रुपयांचे कर्ज काढले होते. कर्जाची रक्कम भरावी, अशी मागणी सतीश थोपटे हा किवळे याचेकडे करीत होता. किवळे याने ३५ लाखांची गाडी घेतली. मात्र, माझ्या घराचे कर्ज भरण्यासाठी त्याच्याकडे पैसे नाहीत, असे स्टेटस सतीश याने आपल्या मोबाईलवर ठेवले. त्यामुळे चिडून जाऊन किवळे वाच्या सांगण्यावरून चौघ हल्लेखोरांनी सिंहगड रस्त्यावरील कोल्हेवाडी येथे कोयत्याने वार करून सतीश थोपटे यांचा खून केला. हल्ल्यानंतर सर्व हल्लेखोर फरार झाले.