पुणे : पुण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रेल्वेमध्ये सॅनिटरी इन्स्पेक्टर म्हणून नोकरीचे नियुक्तीपत्र देण्याच्या बहाण्याने एका व्यक्तीने तब्बल १७ तरुणांना लाखो रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पिंपरी येथील ३५ वर्षाच्या तरुणाने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी राजेश दिनकर राजगुरु (वय-५०, रा. हरीविश्व अपार्टमेंट, पाथर्डी शिवार, नाशिक) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार २०२१ पाासून आतापर्यंत पुणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना राजेश राजगुरु याने रेल्वेमध्ये सॅनिटरी इन्स्पेक्टर या पदावर नोकरीचे नियुक्ती पत्र देण्याचा बहाणा करुन विश्वास संपादन केला. त्यांच्याकडून ऑनलाईन व रोख असे १० लाख रुपये घेतले. फिर्यादी यांच्या ई मेलवर रेल्वेत नियुक्ती मिळाल्याचे बनावट नियुक्तीपत्र पाठविले. तसेच ते खरे असल्याचे भासविले. त्यांना या नियुक्तीपत्रात नाशिक येथे नियुक्ती केल्याचे दाखविले होते.
त्यानुसार ते नाशिकला गेले. त्यावेळी त्यांची अशी कोणतीही नियुक्ती करण्यात आली नसून ते पत्र बनावट असल्याचे त्यांना समजले. त्यानंतर त्यांनी आता पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे. अशा प्रकारे अजून १७ जणांची राजेश राजगुरु याने पैसे घेऊन किमान ५० लाख ६० हजार रुपयांची फसवणुक केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाचा पोलीस उपनिरीक्षक गणेश चव्हाण हे तपास करीत आहेत.