मुंबई: दिवंगत कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी उभारलेला कर्जत येथील एन. डी. स्टुडिओ हा राज्य सरकारच्या महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाने परिचालनासाठी ताब्यात घेतला आहे. यासाठी सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी गुरुवारी एन. डी. स्टुडिओला भेट दिली. तसेच कामकाजाची पाहणी केली. त्यामुळे आता एन. डी. स्टुडिओचे परिचालन व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.
नितीन देसाईंचे स्वप्न
एन. डी. स्टुडिओ हे नितीन चंद्रकांत देसाई यांचे स्वप्न होते. त्यांच्यावर कर्ज होते, त्यामुळे स्टुडिओ गहाण ठेवला. न्यायालयाचा निकाल त्यांच्याविरोधात गेला होता. स्टुडिओ सोडवण्याचा ते प्रयत्न करत होते. पण जाणीवपूर्वक स्टुडिओ ताब्यात घेण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकण्यात आला होता. त्यामुळे त्यांनी ऑगस्ट २०२३ मध्ये आत्महत्या केली.