मुंबई : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतील विजयाने भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएची स्थिती आणखी मजबूत झाली आहे. यामुळे स्थैर्यासोबतच देशात आर्थिक सुधारणांना वेग येईल. गुरुवारी प्रसिद्ध झालेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.
नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र, हरियाणा विधानसभा निवडणुका तसेच उत्तर प्रदेश, बिहारमधील पोटनिवडणुकांच्या निकालाने सत्ताधारी एनडीएची स्थिती मजबूत झाली आहे, असे पीएल कॅपिटल प्रभुदास लीलाधर यांच्या अहवालात नमूद केले आहे. यामुळे देशातील सर्व क्षेत्रांतील प्रमुख सुधारणांकडे धोरण सातत्य राखण्यास मदत होईल. महाराष्ट्रात भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीच्या दणदणीत विजयामुळे एक ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे लक्ष्य गाठण्याच्या राज्याच्या महत्त्वाकांक्षेला मोठी चालना मिळाली आहे. या वर्षी ऑगस्टमध्ये ५०० अब्ज डॉलर अर्थव्यवस्थेचा टप्पा ओलांडणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य होते. राज्य वेगाने आर्थिक प्रगती करत असून ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था होण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत असल्याचे दर्शवते.
अर्थ मंत्रालयाच्या मासिक आर्थिक आढाव्यात म्हटले आहे की, आगामी काळात भारतात अन्नधान्य महागाई दर कमी होईल. यासोबतच चांगला मान्सून, किमान आधारभूत किमतीत वाढ आणि निविष्ठांचा पुरेसा पुरवठा याचा फायदा कृषी क्षेत्राला होऊ शकतो. वस्तूंच्या मागणीची परिस्थिती संमिश्र आहे. मात्र, चांगल्या मान्सूनमुळे ग्रामीण भागातील मागणीत वाढ झाली आहे. आता सुणासुदीचा काळ आणि लग्नाचा हंगाम यावर मागणी अवलंबून आहे.
अहवालात पुढे म्हटले आहे की, डोनाल्ड ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळात जागतिक स्तरावर युद्धे कमी होण्याची अपेक्षा आहे. कच्च्या तेलाच्या किमती स्थिर राहतील. हे भारतीय अर्थव्यवस्थेसाठी चांगले लक्षण आहे. दुसऱ्या तिमाहीत भांडवली खर्च सकारात्मक असल्याने आगामी काळात सरकारच्या भांडवली खर्चात वाढ होण्याची अपेक्षा असल्याचेही सांगण्यात आले.