मुंबई : विधानसभा निवडणुकांचा निकाल लागून सात दिवस उलटून गेले, तरी सुद्धा अजून राज्याला मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण? हे कळू शकलेले नाही. सत्तास्थापना आणि मुख्यमंत्रिपदासंदर्भात काल रात्री दिल्लीत अमित शाह यांच्या निवासस्थानी महायुतीच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत अमित शाह यांच्याकडून काही सूचना देण्यात आल्या. त्यानंतर आज मुंबईत पुन्हा महायुतीची बैठक होणार होती. परंतु, अचानकपणे महायुतीची ही बैठक रद्द करण्यात आली आहे. महायुतीची आज होणारी बैठक पुढे ढकलण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
एकनाथ शिंदे थेट धरणार गावाचा रस्ता…
अमित शाहांनी केलेल्या सूचना आणि निर्णयांबद्दल चर्चा करण्यासाठी आज मुंबई येथे महायुतीच्या तीनही नेत्यांची पुन्हा बैठक होणार होती. परंतु महायुतीची ही बैठक रद्द झाली आहे. पुढील दोन दिवस महायुतीची ही बैठक होणार नसून महाराष्ट्र भाजप गटनेता निवड झाल्यावर महायुतीची बैठक होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. तसेच काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज त्यांच्या मूळगाव देरे सातारा येथे जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार?
विधानसभा निवडणूक निकालात महायुतीला स्पष्ट बहुमत प्राप्त झालं असून महाविकास आघडीचा दारुण पराभव झाला आहे. त्यामुळे आता सत्ता स्थापनेच्या चर्चा सूरु झाल्या असून राज्यातल्या नव्या महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपद मिळाल्यास एकनाथ शिंदेंनी ते स्वीकारावं अशी गळ शिवसेनेच्या नेत्यांनी त्यांना घातल्याची माहिती मिळत आहे. एकनाथ शिंदेंची ठाण्यातली पत्रकार परिषद झाल्यानंतर अनेक नेत्यांनी शिंदेंना तशी विनंती केल्याची माहिती मिळत आहे. आपण सत्तेत राहूनच सरकार चालवावं असा सूर शिवसेनेच्या नेत्यांनी शिंदेंसोबतच्या बैठकीत आवळण्यात आला होता. त्यामुळं एकनाथ शिंदे नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार का?, हे पाहणं रंजक ठरणार आहे.