–युनूस तांबोळी
शिरुर : टाकळी हाजी ते संगमवाडी दरम्यान घोडनदीचे पाणी संपल्याने शेतकऱ्यांनी नदीला पाणी सोडण्याची मागणी केली आहे. या परिसरात कांदा लागवड सुरू झाले असून ऐन लागवडीच्या काळात नदी कोरडी पडल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.
शिरूर तालुक्यातील घोडनदी काठच्या गावांना नदीच्या पाण्यामुळे सुबत्ता आल्याने हा परिसर बागायती पट्टा म्हणून ओळखला जातो. टाकळी हाजी, निमगाव दुडे, आमदाबाद, डोंगरगण, आण्णापुर, म्हसे, संगमवाडी या भागात कांदा, ऊस, डाळिंब ही पिके प्रामुख्याने घेतली जातात. गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून नदीचे पाणी संपले आहे. कांद्याचे रोप लागवडी योग्य तयार झाल्याने शेतकरी नदीला पाणी येण्याची वाट पाहत आहेत.
या संदर्भात घोड व कुकडी कालवा सल्लागार समितीचे सदस्य प्रकाश वायसे आणि पाणी वापर संस्था चळवळीचे नेते सुभाष झिंजाड यांनी नारायणगाव येथील पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत कडूसकर, उपअभियंता दत्तात्रय कोकणे, उपविभागीय अधिकारी आर.जी.हांडे यांची भेट घेतली. यावेळी शेतकऱ्यांची पाण्याची मागणी लवकरात लवकर पूर्ण केली जाईल असे आश्वासन भेटी दरम्यान अधिकाऱ्यांनी दिल्याचे वायसे यांनी सांगितले.
आंबेगाव शिरूर विधानसभा निवडणूक पाणी प्रश्न व डिंबा धरणावर होणारा बोगदा या मुद्द्यावरून चांगलाच गाजला होता. या पुढील काळात कुकडीचे पाणी या गावांना मिळेल की नाही. अशी शंका व्यक्त करत गावागावांमध्ये चर्चा रंगलेली पहावयास मिळत आहे.