पुणे : महाराष्ट्राच्या तापमानात दिवसेंदिवस घट होत आहे. अशात काही भागांना हवामान विभागाकडून शीत लहरींचा इशारा दिला आहे. नाशिकच्या किमान तापमानात मोठी घट झाली असल्याचे बघायला मिळत आहे. पुण्यातही हुडहुडी भरली आहे.
मुंबई शहराचं तापमान घसरायला सुरुवात झाली आहे. लोकल गाड्यांमधील पंखे आता बंदच राहू लागले आहेत. प्रवासी कानटोपी बांधून अगदी कुडकुडत प्रवास करत आहेत. आज मुंबईचं किमान तापमान 15 अंश सेल्सिअस आणि कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस असण्याचा अंदाज आहे. तर, कोकणातही आजकाल अक्षरश: थंडीची लाट आल्यासारखे गार वारे वाहू लागले आहेत. पुण्यात कडाक्याची थंडी पडली आहे. आजही इथलं किमान तापमान 10 अंशांवर घसरण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर, कमाल तापमान 32 अंश सेल्सिअसच्या जवळपास असणार आहे.
मराठवाड्यातल्या तापमानात सातत्यानं बदल होताना पाहायला मिळत आहे. इथलं किमान तापमान कमी-जास्त होतं आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये आज निरभ्र आकाश असणार आहे. इथलं कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 13 अंश सेल्सिअसच्या जवळपास असण्याचा अंदाज आहे. तर, विदर्भात नागपूरमध्ये आज आभाळ ढगाळ असेल. इथलं कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 13 अंश सेल्सिअस असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात थंडीचा जोर सर्वाधिक आहे.
उत्तर महाराष्ट्रात नाशिकमध्ये कडाक्याची थंडी पडली आहे. त्यात हवामान विभागानं आता इथं शीत लहरींचा इशारा दिला आहे. नाशिकच्या किमान तापमानात सर्वाधिक घट नोंदविण्यात आली आहे. आज इथलं किमान तापमान पुन्हा 9 अंश सेल्सिअसवर घसरण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नाशिककरांना थंडीचा प्रचंड कडाका सहन करावा लागणार आहे.