-राहुलकुमार अवचट
यवत : संपूर्ण महाराष्ट्रात भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व मित्रपक्ष अशा महायुतीची सत्ता आली. संपूर्ण पुणे जिल्ह्यात महायुतीतील भाजपाचे एकमेव उमेदवार असलेले राहुल कुल व ऐन निवडणुकीच्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात गेलेले महाविकास आघाडीचे रमेश थोरात यांचा दारुण पराभव केला. संपूर्ण दौंड तालुक्यात विजय उत्सव साजरा होत असताना पश्चिम भागातील प्रमुख गाव असलेले यवत येथे देखील महायुतीच्या कार्यकर्त्यांनी व यवतकरांनी फटाके व गुलालाची उधळण करत मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा केला.
बुधवारी (दि. 20 नोव्हेंबर) रोजी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर सर्वांना दि. 23 नोव्हेंबर रोजी काय निकाल लागतो याची आतुरता होती. राहुल कुल यांनी कोरोना काळात जनतेसाठी केलेल्या उपाययोजना, मुख्यमंत्री सहाय्यता निधी व इतर अनेक योजनेच्या माध्यमातून रुग्णांसाठी केलेली मदत, पाणी, शेती, विज, रस्ते यांसह तालुक्यात केलेले अनेक विकास कामे यांच्या जोरावर राहुल कुल हे पुन्हा विजयी होणारच अशी खात्री यवतकरांना होती. यामुळे निकालापूर्वीच यवत गावात अनेक ठिकाणी विजयी आमदार राहुल कुल असे फलक लावण्यात आले होते. फक्त आतुरता होती ती मताधिक्य किती राहील याची.
आज सकाळी आठ वाजता दौंड येथे मतमोजणी सुरू होताच पहिल्या फेरीपासून राहुल कुल हे आघाडीवर असल्याने यवतकरांनी सकाळपासूनच गावातील मुख्य चौकात गर्दी करण्यास सुरुवात केली. जसजसे फेऱ्यांची मतमोजणी पुढे जात होती, तसतसे आमदार राहुल कुल यांचे मताधिक्य वाढत असल्याने दुपारी बारानंतर डीजेच्या तालावर ताल धरत गुलालाची व फटाक्यांची आतिषबाजी करत यवतकरांनी जल्लोष करण्यास साजरा केला.
या जल्लोषात पुरुषांबरोबरच महिला देखील मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या. महिलांनी जेसीबीवर उभे राहत मोठ्या प्रमाणात गुलालाची उधळण केली. दुपारी आमदार राहुल कुल यांनी विजयी मताधिक्य मिळवल्याने यवतकरांनी संपूर्ण गावात डीजे व जेसीबीच्या साह्याने संपूर्ण गावात विजयी फेरी काढत विजय उत्सव साजरा केला. विजयी मिरवणुकीत जय श्रीराम, महायुतीचा विजय असो, एकच वादा राहुल दादा आदी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली.
यावेळी पुरुषांबरोबरच महिला पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.