पुणे : महाराष्ट्राच्या 2024 च्या विधानसभेच्या निवडणुकीचा आज निकाल लागतोय. राज्यात कोणाची सत्ता येणार हे चित्र सध्या स्पष्ट होत आहे, आतापर्यंत आलेल्या आकड्यांवरून महायुतीची सत्ता राज्यात येणार असल्याचं दिसतंय. तर ज्या मतदार संघाकडं अवघ्या महाराष्ट्राचं नव्हे तर देशाचं लक्ष लागलं होतं, त्या बारामती मतदार संघात अजित पवारांचा मोठा विजय झाला आहे. या विजयानंतर अजित पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले अजित पवार ?
राज्यात लाडक्या बहिणींनी महायुतीला भरभरुन मते दिल्याने सर्वांचेच अंदाज चुकले.., असे मत व्यक्त करत अजित पवारांनी लाडक्या बहिणींचे आभार मानले आहे.
अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, राज्यात लाडक्या बहिणींनी महायुतीला भरभरुन मते दिली. त्यामुळे सर्वांचेच अंदाज चुकले. राज्य सरकारने ज्या कल्याणकारी योजना राबविल्या त्याचे प्रतिबिंब या मतदानाच्या आकडेवारीवरुन समोर येत आहे. राज्यामधील तमाम मतदारांचे मी मनापासून आभार मानतो. राज्यातील जनतेने जो विश्वास दाखविला आहे. त्याला पात्र ठरुन राज्याला विकासाच्या वाटेवर नेण्याचेच काम महायुती करणार आहे.
राज्यातील जनतेने महायुतीला कौल दिल्यानंतर अजित पवार यांनी एक्स या समाजमाध्यांवर एक ट्विट केलं आहे. त्यांनी हे ट्विट करताना एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत अजित पवार यांच्या हातात गुलाबी रंगाचे पुष्पगुच्छ आहे. या फोटोसोबत त्यांनी तीन ओळींचे खास कॅप्शन दिले आहे. महाराष्ट्राने गुलाबी रंग निवडला, असं अजित पवार यांनी म्हटले आहे.
राज्यातील मतदारांचे आभार मानावे तेवढे कमी आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये बारामती आणि महाराष्ट्राच्या मतदारांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि महायुतीवर जो विश्वास दाखविला तो अविश्वसनीय आहे, असेही अजित पवार म्हणाले.
दरम्यान, अवघ्या राज्याचे लक्ष लागलेल्या बारामती मतदारसंघात अखेर अजित पवार यांचा विजय झाला आहे. त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार युगेंद्र पवार यांना पराभूत केलं आहे. अजित पवार यांना 73 हजार 025 मतं मिळाली आहे. तर शरद पवार गटाचे उमेदवार युगेंद्र पवार यांना 34 हजार 773 मतं मिळाली आहे. अजित पवार यांनी तब्बल 38 हजार 252 मतांनी आघाडी मिळवली आहे.