मुंबई : संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या वरळी विधानसभा मतदारसंघाचा निकाल हाती आला आहे. वरळी विधानसभा मतदारसंघातून आदित्य ठाकरे यांचा दणदणीत विजय झाला आहे. तर शिंदे गटाचे मिलिंद देवरा आणि मनसेचे संदीप देशपांडे यांचा प्रभाव झाला आहे. विधानसभा निवडणुकांच्या घोषणेपासूनच वरळी मतदारसंघ जोरदार चर्चेत राहिला आहे.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आणि माजी मंत्री आदित्य ठाकरेंना पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलं होतं. तर, आदित्य ठाकरे यांच्या विरोधात मनसेकडून संदीप देशपांडे तर, शिवसेनेच्या शिंदे गटाकडून मिलिंद देवरांना उमेदवारी देण्यात आली होती. तिन्ही उमेदवारांमध्ये अत्यंत चुरस रंगली होती.
विद्यमान आमदार वि. महायुती आणि मनसे अशी लढत चुरशीची ठरली. मिलिंद देवरा लोकसभा निवडणुकीआधी काँग्रेसमधून शिंदेंच्या शिवसेनेमध्ये आले आणि शिंदेंनी त्यांना राज्यसभेवर खासदारही केलं. मात्र, वरळीतून टक्कर देणारा चेहरा म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांच्याविरोधात मिलिंद देवरा यांना उतरवलं होतं.
मुंबईतील वरळी मतदारसंघानं कायमच शहराच्या आणि राज्याच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. शहरातील प्रमुख भागांना जोडणाऱ्या या भागामुळं हा मतदारसंघ अत्यंत महत्त्वाचा आहे. सुरुवातीला या मतदारसंघावर काँग्रेसचा दबदबा होता. 2014 च्या निवडणुकीमध्ये मात्र, येथे शिवसेनेनं पुन्हा आपली जागा मिळवली.
त्यानंतर 2019 च्या विधानसभा निवडणुकीत वरळी मतदारसंघ शिवसेनेकडेच राहिला. त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी या मतदारसंघात गतकाळातील निवडणुकीत 89248 मतांनी घवघवीत यश मिळवलं. यंदाच्या निवडणुकीत त्यांच्यापुढं मिलिंद देवरा आणि संदीप देशपांडे यांचं आव्हान असल्यामुळं या तिरंगी लढतीकडे सर्वांचंच लक्ष लागलं होतं.