-राहुलकुमार अवचट
यवत : विधानसभा निवडणूक 2024 चे निकाल समोर येत असून राज्यामध्ये पुन्हा एकदा माहितीचे सरकार स्थापन होत आहे. दौंड तालुक्यात विद्यमान आमदार राहुल कुल यांनी सलग तिसऱ्यांदा विजय होत विजयाची हॅट्रिक केली असून तिन्ही वेळेस प्रतिस्पर्धी असलेले रमेश थोरात यांचा दारुण पराभव केला आहे .
दौंड विधानसभेची निवडणूक अटीतटीची होईल असा अंदाज अनेक जणांनी व्यक्त केला होता. परंतु राहुल कुल यांनी पहिल्या फेरीपासून आघाडी घेत जवळपास 14 हजार मतांनी विजय खेचून आणला. दौंड विधानसभा मतदारसंघात भाजप व महायुतीचे उमेदवार विद्यमान आमदार राहुल कुल हे 13906 मतांनी विजयी झाले आहेत. महायुतीचे उमेदवार राहुल कुल आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे रमेश थोरात यांच्यात अटीतटीची लढत होईल असा तर्क अनेक जण लावत होते. परंतु राहुल कुल यांनी तालुक्यात केलेली विकास कामे व आरोग्य सेवेत तालुक्यातील जनतेची केलेली मदत यामुळे एकतर्फी विजय संपादित करत अटीतटीच्या समजल्या जाणाऱ्या लढतीत राहुल कुल यांनी एकतर्फी बाजी मारली.
दौंड मतदारसंघातील 3 लाख 19 हजार 311 मतदारांपैकी 2 लाख 30 हजार 766 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता त्यामध्ये 1 लाख 16 हजार 383 पुरूष तर त्याचबरोबर 1 लाख 14 हजार 381 महिला मतदार यांचा समावेश होता. आज (ता. 23) सकाळी आठ वाजता दौंड शासकीय गोदाम येथे मतमोजणीस सुरवात झाली.
सुरुवातीपासूनच महायुतीचे उमेदवार राहुल कुल यांनी निकालात आघाडी घेतली होती. अखेरच्या फेरी अखेर महायुतीचे उमेदवार राहुल कुल यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार रमेश थोरात यांचा 13906 मताने दणदणीत पराभव केला. आमदार राहुल कुल यांच्या विजयानंतर दौंड तालुक्यातील अनेक गावांमध्ये विजय उत्सव साजरा करण्यात येत असून सर्वत्र गुलालाची उधळण करत मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा करण्यात येत आहे .