कर्जत : संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाचा निकाल हाती आला आहे. कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांचा विजय झाला आहे. तर भाजपचे राम शिंदे यांचा पराभव झाला आहे. विधानसभा निवडणुकांच्या घोषणेपासूनच कर्जत-जामखेड विधासभा मतदारसंघ जोरदार चर्चेत राहिला आहे.
रोहित पवार विरूद्ध भाजपचे माजी मंत्री राम शिंदे यांच्यामध्ये लढत झाली. 2019 च्या निवडणुकीत रोहित पवार या मतदारसंघांमध्ये निवडून आले होते. मात्र, यावेळी रोहित पवार यांच्यासाठी कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातील निकाल धक्कादायक ठरण्याची शक्यता होती. अखेर अटीतटीच्या लढतीमध्ये रोहित पवार विजयी झाले आहेत. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत राम शिंदे कर्जत- जामखेड मतदारसंघातून विजयी झाले होते. मात्र, 2019 च्या विधानसभा निवडणुकीत रोहित पवार यांनी त्यांचा पराभव केला होता.
कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात काटे की टक्कर अशी परिस्थिती पाहायला मिळाली. भाजपाचे राम शिंदे हे देवेंद्र फडणीस यांचे अत्यंत विश्वासू सहकारी मानले जात आहेत.
या प्रतिष्ठेच्या लढाईमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या देखील सभा कर्जत जामखेड मध्ये झाल्या होत्या. यामध्ये कर्जत जामखेडच्या मतदारांना फडणवीस यांनी राम शिंदेंना निवडून आणल्यास त्यांना चांगली जबाबदारी देऊ, असा शब्द दिला होता. मात्र, दुसऱ्यांदा रोहित पवार यांच्याकडून राम शिंदेंचा पराभव झाला आहे. त्यामुळे राम शिंदेंची निकराची झुंज अपयशी ठरली आहे.
उमेदवार व त्यांना मिळालेली मते
- रोहित पवार – १ लाख २७ हजार ६७६
- राम शिंदे – १ लाख, २६ हजार ४३३
- रोहित चंद्रकांत पवार – ३ हजार ४८९
- अपक्ष राम नारायण शिंदे – ३९२