पुणे: महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल समोर आला असून मतदारांनी महाविकास आघाडीला मोठा धक्का दिला आहे. भाजप, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्या महायुतीला मतदारांनी भरभरून मतदान केलं असून त्यांना लाडक्या बहिणींचा भरभरून आशीर्वाद मिळाल्याचे या निकालातून स्पष्टपणे दिसून येत आहे. महायुतीने २२९ जागांवर आघाडीवर असून केवळ ५४ जागा महाविकास आघाडीच्या वाट्याला येत असल्याचे दिसत आहेत. यामध्ये भारतीय जनता पक्षाने १३३, शिवसेना (शिंदे गट) ५६ आणि राष्ट्रवादीने (अजित पवार गट) ४० जागांवर आघाडी मिळवली आहे.
गेल्या जुलै महिन्यात अर्थसंकल्प सादर करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. त्याअंतर्गत 21 ते 65 वयोगटातील महिलांना दरमहा 1500 रुपये मिळत आहेत. राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केली. संपूर्ण राज्यात राज्यात साधारण दोन कोटी महिला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी ठरल्या. विधानसभा निवडणुकीपर्यंत राज्यातील लाभार्थी महिलांना साडे सात हजार रूपये त्यांच्या बँक खात्यात जमा झाले. मात्र विरोधकांकडून यावरून सत्ताधाऱ्यावर जोरदार टीका करण्यात आली. तर लाडक्या बहीण योजनेचा विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारला सर्वाधिक फायदा होईल अशी चर्चा सुरू होती. आणि हेच खरे ठरले आहे. लाडकी बहीण योजनेचा मोठा फायदा भाजप आणि पर्यायाने महायुतीला झाल्याचं दिसत आहे. लाडक्या बहिणींनी महायुतीला भरभरून मतदान केल्याचं चित्र या निवडणुकीत दिसून आले आहे. .