मुंबई : सध्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी होत आहे. दुपारपर्यंत दोननंतर कोणाचे सरकार येणार, हे स्पष्ट होणार आहे. त्याआधी राज्यात चर्चेत असलेल्या संगमनेर मतदारसंघात काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात निवडणूक लढवत आहेत. या मतदारसंघातून आता धक्कादायक ट्रेंड समोर समोर येत आहे. मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून बाळासाहेब थोरात पिछाडीवर आहेत.
बाळासाहेब थोरात हे काँग्रेसचे दिग्गज नेते आहेत. राज्यात त्यांना काँग्रेसमध्ये वरिष्ठ नेत्यांच्या रांगेत स्थान दिले जाते. याच कारणामुळे जर राज्यात महाविकास आघाडीला बहुमत मिळाले असते, तर बाळासाहेब थोरात हे मुख्यमंत्रिपदाच्या प्रमुख दावेदारांपैकी एक मानले जात होते. मात्र मतमोजणीच्या पहिल्याच कलापासून बाळासाहेब थोरात हे पिछाडीवर गेले आहेत.
अमोल खताळ आघाडीवर
बाळासाहेब थोरात महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाने अमोल खताळ यांना तिकीट दिलेले असून ते महायुतीचे अधिकृत उमेदवार आहेत. खताळ यांनी मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून बाळासाहेब थोरात यांना मागे टाकले आहे. त्यामुळे संगमनेरमध्ये नेमकं काय घडणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.