पुणे : राज्यभरामध्ये काल 288 विधानसभा मतदारसंघासाठी मतदान पार पडलं आहे. मतदान पार पडल्यानंतर काही वेळातच अनेक एक्झिट पोल्स समोर आलेत. या पोलनुसार राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार स्थापन होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र, काही मतदारसंघांमध्ये झालेल्या अटीतटीच्या लढाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. लोकसभेप्रमाणेच विधानसभेमध्ये सुद्धा बारामती मतदारसंघ चर्चेत राहिला आहे. पवार विरुद्ध पवार अशी लढत बारामती मतदारसंघात बघायला मिळाली आहे. अशातच शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माळशिरसचे उमेदवार उत्तमराव जानकर यांनी बारामती मतदारसंघाबाबत आणि अजित पवारांच्या विजयाबाबत एक मोठं विधान केलं आहे, त्या विधानाची सध्या चांगलीच चर्चा होऊ लागली आहे.
उत्तम जानकर यांनी ‘अजित पवार चाळीस हजार मतांनी पडणार’ असल्याचं विधान केलं आहे. अजित पवार यांचा बारामतीमध्ये चाळीस हजार पेक्षा जास्त मताने पराभव होईल असा ठाम दावा यावेळी उत्तम जानकरांकडून करण्यात आला आहे. अजित पवारांना मत म्हणजे भाजपाला मत अजित पवारांना मत म्हणजे देवेंद्र फडणवीस यांना मत त्यामुळे बारामतीत आता विजय सोपा राहिलेला नाही. राज्याच नेतृत्व केलेला तो तालुका आहे, राज्यामध्ये महाविकास आघाडीच्या 180 ते 200 जागा नक्की निवडून येतील असा विश्वासही त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. तसेच योगेंद्र पवार 40 हजार पेक्षाही अधिक मताधिक्यांनी निवडून येणार असा विश्वास सुद्धा उत्तम जानकर यांनी व्यक्त केला आहे.
बारामतीमध्ये अजितदादा की युगेंद्र पवार..?
शरद पवारांची सांगता सभा जर लक्षात घेतली तर हे दिसून येईल की शरद पवारांनी बारामतीतील मतदारांना युगेंद्र पवार यांना संधी देण्याचं आवाहन केलं होतं. युगेंद्र पवार देखील बारामतीचा चांगला विकास करू शकतील त्याचबरोबर ते उच्चशिक्षित आहेत. तरुण आहेत. संपूर्ण गोष्टीची त्याला जाण आहे. शेती विषयी कारखानदारी याबद्दलची त्यांना माहिती आहे. त्यांना तुम्ही संधी द्या आतापर्यंत तुम्ही मला तीस पर्यंत तीस वर्ष संधी दिली. त्यानंतर अजित पवारांना संधी दिली. आता योगेंद्र पवारांना पुढच्या काळात तुम्ही संधी द्यायला हवी.
अजित पवारांनी आपल्या सांगता सभेमध्ये मी विकासाचा मुद्दा घेऊन पुढे आलेलो आहे असं सांगत असताना म्हटलं की, मी विकास पुरुष आहे. मी काम करतो पुढच्या काळात देखील मी विकासावर भर देणार आहे. त्यामुळे तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहा असं अजित पवारांनी आवाहन केलं होतं. त्यामुळे दोघं विकासाच्या मुद्द्यावर पुढे जात आहेत. शरद पवारांना मानणारा गट आणि अजित पवारांना मानणारा गट हा बारामती तालुक्यात मोठ्या प्रमाणावर आहे. आता हा नेमका तरुण आणि वयस्कर वयोगटातला मतदार कोणत्या उमेदवाराला संधी देईल हे सांगणं आता थोडं कठीण असलं तरी शहरांमध्ये अजित पवारांच माप थोडं झुकतं आहे, तर मात्र ग्रामीण भागामध्ये युगेंद्र पवारांनी बाजी मारल्याचं चित्र आहे.